School Timing Change महाराष्ट्रातील शाळांची वेळ बदलणार, राज्यपालांचा मोठा निर्णय

School Timing Change : शाळकरी मुलांची पुरेशी झोप होत नसल्याने ताणतणावासह आरोग्याच्या तक्रारी येत असल्याची वस्तुस्थिती नाकारता येणार नाही. राज्यपालांच्या सूचनेमागेही हाच विचार असावा. तरीही त्यामुळे उशिरा झोपण्याला उत्तेजन मिळू शकते, अशी रास्त भीती शिक्षण क्षेत्रातील कार्यकर्ते व्यक्त करतात. गेल्या काही वर्षांत केवळ उच्चभ्रू वर्गातच नव्हे, तर सर्वसामान्यांतही टीव्ही, मोबाइल, उशिराच्या पार्ट्या वा कार्यक्रमांमुळे कुटुंबीयांची झोपेची वेळ रात्री बाराच्या पुढे सरकत चालली आहे. स्वाभाविकच मुलेही उशिरा झोपतात व शाळेसाठी लवकर उठावे लागल्याने त्यांना पुरेशी झोप मिळत नाही.

 

अशा पालक व मुलांसाठी शाळांची वेळ बदलणे, हे एकप्रकारे उशिरा झोपण्याला उत्तेजन देण्यासारखे आहे. शाळेच्या धाकाने अनेक घरे रात्री लवकर निद्राधीन होऊन प्रात:काली जागी होतात. शाळांची वेळ बदलल्यास हे उरलेसुरले बंधनही गळून पडण्याची भीती आहे. अनेक शाळा दोन सत्रांत भरतात.

पहिले सत्र उशिरा सुरू झाल्यास नंतरच्या सत्रालाही विलंब होणार, मुले उशिरा घरी येणार. मग त्यांना खेळ, गृहपाठ, शिकवणीवर्ग या साऱ्यांना वेळ कोठून मिळणार, असाही प्रश्न निर्माण होतो. तथापि, मुलांच्या आरोग्याचा विचारही दुर्लक्षिता येणार नसल्याने शाळांच्या वेळेबाबतच्या प्रश्नाला सोपे वा एका वाक्यात उत्तर देता येण्यासारखे नाही.

पाल्यांच्या आरोग्याची काळजी महत्त्वाची आहेच. त्यासाठी स्वत:सह मुलांनी रात्री लवकर झोपावे, यासाठी पालकांनी प्रामाणिक प्रयत्न करायला हवेत. शाळांनीही मध्यममार्ग काढून गरज असेल, तेथे वेळांची लवचिकता वाढवायला हवी. अनेक शाळा तीव्र ऊन वा थंडीच्या काळात असे बदल करीत असतातच. त्यामुळे केवळ राज्यपालांनी सूचना केली, म्हणून तिची सरसकट अंमलबजावणी करणे किंवा डोळे झाकून विरोध करणेही तितके व्यवहार्य नाही. कोणतेही सरसकटीकरण अंतिमत: चुकीचे व सर्जनशीलतेला मारकच असते. राज्यपालांनाही ते अपेक्षित नसावे.

अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा 

Leave a Comment